
मा.श्री श्रीकांत मोरे .... आदर्श मार्गदर्शक
सौ.शोभा श्रीकांत मोरे .... आदर्श मार्गदर्शिका
The supreme quality for leadership is unquestionable integrity. Without it, no real success is possible, no matter whether it is on a section gang, a football field, in an army, or in an office.
-Dwight D. Elsenhower
लाघवी स्वभाव, उपक्रमशीलता, कवी आणि साहित्यावर नितांत प्रेम...
महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी अर्थात सहकार खात्यातील जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे यांच्या व्यक्तीमत्वाची विशिष्ट्ये. स्वभावातील ऋजुता आणि कवित्व, हे त्यांना निसर्गत: लाभलेलं वरदान आहे. लाघवी स्वभावामुळेच माणसं त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांच्याच सहवासात राहून ती एकात्म होतात अन त्यातूनच अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष आयेसनहावर म्हणतात त्याप्रमाणे यश संपादन होते. श्रीकांतजी अनेक क्षेत्रात वावरतात, सहकार खाते असो, साहित्य क्षेत्र असो किंवा बँकिंग, माणसं एकत्र आणण्याच्या या सर्व क्षेत्रात ते यशस्वी झाले आहेत. एक आदर्श शासकीय अधिकारी म्हणून त्यांना लौकिक प्राप्त झाला आहे.
श्रीकांत मोरे यांचे पिता सदाशिवराव हे १९७४ साली भाग शिक्षणधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यावेळचा पगार तोकडा, त्यामुळे पेन्शनही कमीच. घरात पाच मुले, तीन मुली शिक्षण घेत होत्या. अशात श्रीकांत मोरे १९७४ साली एस.एस.सी. परीक्षा पास झाले. आर्थिक ओढाताण पाहून नोकरी करण्याचा विचार त्यांनी वडिलांसमोर बोलून दाखवला. वडीलांनी सक्त विरोध केला. ते म्हणाले, मी पुन्हा खाजगी नोकरी करेन, तुम्ही मात्र सर्वानी शिकायचे. शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय नोकरीचा चिचार करायचा नाही. सर्वच मुलांना उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न वडीलांनी आट्टाहासाने आणि जिद्दीने पूर्ण केले.
एम.ए. (इंग्रजी) पूर्ण केल्यानंतर शंकरराव काळे त्यांच्या कोळपेवाडीच्या पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजीचे शिक्षक म्हणून श्रीकांत मोरे यांनी नोकरी पत्करली. दोनच वर्षांनी एम.पी.एस.सी. ची तयारी करून ते लेखाधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले होते. ठाणे परिवहन विभागात काम करताना राजपत्रित अधिकारी अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यानंतर सोलापुरात कृषी खात्यात बदली झाली. याच काळात साहित्यिक क्षेत्रात थेट वावर सुरु झाला. लाघवी, वकृत्व, अभ्यासपूर्ण विवेचन यामुळे आकाशवाणी केंद्रावर बोलण्याची संधी त्यांना सातत्याने मिळत गेली. बालपणापासून कवितेची आवड होतीच. कॉलेज जीवनात डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या साहित्याची, क़ै. भोगीशियन यांच्या प्रशासन कौशल्याची पडलेली छाप श्रीकांत मोरे यांच्या मनात कायमची घर करून राहिली. तीच प्रेरणा आणि आकर्षण श्रीकांत मोरे यांच्या साहित्यिक आणि प्रशासकीय सेवेची शिदोरी ठरली.
वडीलांनी उच्च शिक्षणाचा धरलेला आग्रह आठही भावंडानी तडीस नेला. त्यात श्रीकांत मोरे यांनी अनेकविविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला. प्रशासकीय सेवा करीत साहित्याशी त्यांनी नाते जोडले. साहित्यामुळे अनेक नामवंत साहित्यिक, कवी यांच्याशी जवळीक साधण्याची संधी त्यांना मिळाली. लेखनाची प्रेरणा मिळाली. साहित्य सेवेतून सन्मानाचे आणि आनंदाचे प्रसंग अनुभवता आले.
‘रंग भावलेले’, ‘आई’, ‘निसर्ग’, ‘भावसुमने’, ‘पाझर’,’नवरस’,’संवेदना’, ‘आई माझी शाळा’ अशा आठ काव्यसंग्रहाची निर्मिती त्यांनी केली. ‘आई’ , ‘भावरंग’ , ‘रंग भावलेले’ या काव्यसंग्रहाच्या दोन आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. ‘भावरंग’, विचारधारा’,’चिंतन’ हे ललित लेखसंग्रह तर ‘शोध अंतर्मनाचा’, ‘ अंतर्मन’ हे कथासंग्रह त्यांच्या नावे जमा आहेत. विविध साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सोलापूरातील संस्कृतीक चळवळ चालवण्यात त्यांनी चार साहित्य संमेलने आयोजित केली. साहित्य संमेलने ही ठराविक समाजाची मक्तेदारी होती. ती मोडीत काढून ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांना श्रीकांत मोरे यांनी मनोरमा व्यासपीठ मिळवुन दिले. या साहित्यकांना उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी मनोरमा परिवाराच्यावतीने साहित्यसेवा पुरस्कार दिला जातो. वडील क़ै. सदाशिव रामचंद्र मोरे आणि मातोश्री क़ै. मनोरमा सदाशिव मोरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी साहित्य क्षेत्रातील मंडळीना मनोरमा परिवाराच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविले जाते.
वडील सदाशिव मोरे यांचा अर्थकारणाचा वारसा श्रीकांत मोरे यांनी सचोटीने जपला आहे. वडीलांनी १९८४ साली कौटुंबिक बचत गटाची स्थापना केली. सर्व भावंडांना गरजेनुसार व्यवसाय वृद्धीसाठी त्यांची बचत गटातून व्याजाने रकमा दिल्या. त्यातूनच इंदिरानगर परिसरात अनेक बचत गट उदयास आले. मोलमजुरी, धुणीभांडी करणाऱ्या
महिलांना आर्थिक आधार देणारे बचत गट सदाशिवराव मोरे यांच्या प्रेरणेतून स्तापण झाले. हेच प्रेरणा मनोरमा परिवारासाठी साह्यभूत ठरली. पाहता-पाहता मनोरमा परिवाराने सामाजिक बांधलकीतून अनेकांचे संसार उभे केले. विजापूर रोड परिसरात झोपडपट्टीची संख्या अधिक आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाला रोजगाराचे समस्या नेहमी भेडसावते. श्रीकांत मोरे या गरीब कष्टकऱ्याचे तारणहार बनले. पोटापाण्याच्या विवंचनेत असलेल्या कुटुंबांना पतसंस्था, मनोरमा बँकेतून आर्थिक आधार दिला. या भागातील अनेक तरुण बँकेच्या मदतीने स्वत:चे छोटे- छोटे उधोग उभारून आपली उपजीविका करताहेत. केवळ आर्थिक मदतच नाही तर व्यवसायाचे मार्गदर्शन श्रीकांत मोरे यांनी केले.
वृक्षवेलींवर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करणारे सदाशिवराव मोरे यांचा वारसा श्रीकांत मोरे यांनी जपला. समाजिक जाणीव आणि वृक्षराजीवारचे प्रेम यामुळे १९८५ साली वडील सदाशिवराव मोरे यांनी इंदिरा रोपवाटिका सुरु केली. या रोपवाटिकांमध्ये वर्षभर फुलं आणि फळांची रोपे मिळतात. रोपवाटिकेतील वेगळेपण श्रीकांत मोरे आणि शोभा मोरे यांनी नेहमीच जपलं आहे.
सहकार खात्याच्या सेवेत रजू झाल्यानंतर मनोरमा परिवाराच्या उभारणीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला.दि. ०९ मी १९९७ रोजी मनोरमा बँकेला परवाना मिळाला. श्रीकांत मोरे यांनी सोलापूर जिल्यात २४ नव्या बँकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले. मनोरमाचाही त्यातच समावेश आहे. विश्वासाहर्ता आणि लोकांचे पाठबळ मिळवत मनोरमा बँकेने सोलापूर शहरात नावलौकिक मिळवला. श्रीकांत मोरे यांची दूरदृष्टी, कल्पकता, सचोटी या बँकेच्या उभारणीपासून आजपर्यंतच्या वाटचालीत दिसून येते. वडील सदाशिवराव मोरे यांनी ८१ व्या वर्षी बँकेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. अत्यधुनिक बँक सेवेचा आदर्श श्रीकांत मोरे यांनी मनोरमा बँकेच्या रूपाने सोलापूरच्या बँकिंग क्षेत्रासमोर ठेवला आहे. पहिल्याच दिवसापासुन ही बँक संगणकीकृत आहे. सुरवातीपासूनचा प्रतिकर्मचारी ६.५ कोटीचा व्यवसाय व्यवसाय बँकेने आजही राखला आहे. पत्नी शोभा मोरे यांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आणि स्वत:चा सहकार क्षेत्रातील अनुभव एकत्र करीत श्रीकांत मोरे यांनी सहकाराचे जाळे विणले. महिलांच्या पाच पतसंस्थाची उभारणी त्यांनी केली. मनोरमा महिला नागरी पतसंस्था, महिला बचत गट, मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी या पतसंस्थाचा संपूर्ण कारभार महिलाच संभाळतात. त्याची उलाढाल ही ६०० कोटीच्या घरात आहे. भावंडांचे योगदान, त्यांचा सामाजिक क्षेत्रातील वावर मार्गदर्शन याचा पुरेपूर लाभ घेत श्रीकांत मोरे यांनी मनोरमा परिवाराची भक्कम पायावर उभारणी केली आहे.
उधोगतेचे बाळकडू मोरे परिवाराला वडीलांकडून मिळाले आहे. तोच वारसा तिसऱ्या पिढीने पुढे चालविला. मनोरमा कन्स्टक्शनच्या माध्यमातून दरवर्षी २४ प्लॉटची निर्मिती केली जाते. उद्योजक अनिल पंधे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम क्षेत्रावर ‘मनोरमा’ ने काम केले आहे.
मोरे परिवारातील एकतरी मुलगा डॉक्टर व्हावा. अशी सदाशिवराव मोरे यांची इच्छा होती. स्वत:च्या मुलांना करीअरसाठी स्वातंत्र दिल्याने विविध क्षेत्रांत मुलांनी नांव कमावले, मात्र, कुटुंबात डॉक्टर कोणीही बनले नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा श्रीकांत मोरे यांनी आपल्या मुलांना दिली. मुलगा सुमित सध्या एम.डी. मेडीसीन करून मनोरमा हॉस्पिटल या नावाने जुळे सोलापूर भागात हॉस्पिटल उघडले आहे. सून सौ.मिताली ह्या डॉक्टर एम.बी.बी.एस. झाली आहे. तर मुलगी ऋचा एम.बी.बी.एस. झाली आहे. आजोबांची इच्छा नातवंडाकडून पूर्ण केली जात आहे. याचा श्रीकांत मोरे यांना मनस्वी आनंद आहे.